इतिहास व इंग्रजीत पाच पेक्षा कमी गुण : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचा आरोपगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या बी.ए. अंतीम वर्षातील पाचवे सेमिस्टरच्या १०९ विद्यार्थ्यांना इतिहास व इंग्रजी या दोन विषयात शून्य ते पाच गुण दिले आहे. अशा गुणपत्रिकाही तयार करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेऊन नियमित तास करणाऱ्या हुशार व गरीब विद्यार्थ्यांना नापास करून विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका मूल्यमापन पद्धतीत दोष आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी बल्लारपूरचे नगरसेवक राजू झोडे, सोशालिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलास कोडाप, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोनल भडके, नरेश वाकडे, राजू बन्सोड, मिलिंद बांबोळे, सुरेश खोब्रागडे, विवेकराजे बारसिंगे उपस्थित होते. यावेळी झोडे यांनी सांगितले की, चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून ११८ विद्यार्थ्यांनी इतिहास, इंग्रजी विषय घेऊन बीए अंतिम वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरची परीक्षा दिली. यापैकी १०९ विद्यार्थ्यांना पाच पेक्षा कमी गुण घेऊन सरसकट नापास करण्यात आले. नापास करण्यात आलेली सदर १०९ विद्यार्थी हे यापूर्वीच्या चारही सेमिस्टरमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी नियमित तास करून संपूर्ण पेपर व्यवस्थित सोडविला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शुन्य ते पाच गुण कसे मिळू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे शिष्टमंडळ आठवडाभरापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना भेटले. त्यानंतर पक्षाच्या वतीने शुक्रवारी शेकडो विद्यार्थी व कार्यकर्त्यांना घेऊन विद्यापीठावर धडक दिली. मात्र यावेळी कुलगुरू डॉ. कल्याणकर उपस्थित नव्हते, असेही त्यांनी सांगितले. चुकीचे मुल्यमापण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच कमी गुण देऊन नापास करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे नि:शुल्क फेर मुल्यांकन करण्यात यावे, अन्यथा पक्षाच्या वतीने कुलगुरूंना घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी अन्यायग्रस्त विद्यार्थी सचिन सातपुते, रूपेश सातपुते, अपेक्षा रायुपरे, अमोल गेडाम हजर होते. (प्रतिनिधी)
गोंडवानात उत्तरपत्रिका मूल्यमापन पध्दतीत दोष
By admin | Published: July 02, 2016 1:36 AM