केंद्र शासनाला लाखोंचा चुना : एकाच सिलिंडरची दोनदा सबसिडी जमागडचिरोली : ग्राहकांने सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर सिलिंडर ग्राहकाच्या घरी उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे ग्राहक आणखी १५ दिवसानंतर सिलिंडरची नोंदणी करते. यामध्ये पहिल्या नोंदणीचे सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून न देता त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा गोरखधंदा गॅस एजन्सीधारकांनी सुरू केला आहे. यामुळे शासनाला अनुदानापोटी लाखो रूपयांचा चूना लागत आहे. गॅस सिलिंडर वितरणातील होणारा गैरव्यवहार थांबविण्यासाठी शासनाने गॅस सिलिंडरची सबसिडी संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कार्डधारकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहेत. ५० ते ६० टक्के कुटुंबांना वर्षाचे १२ सिलिंडरची गरज पडत नाही. सिलिंडर बुकींग केल्यानंतर सदर सिलिंडर घरपोच उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गॅस एजन्सी मालकाची आहे. मात्र बऱ्याचवेळा गडचिरोली शहरातील एक गॅस एजन्सी मालक १० ते १५ दिवस उलटूनही गॅस सिलिंडर घरी पोहोचवून देत नाही. (त्यांच्या दुकानासमोर नेहमीच सिलिंडर घेणाऱ्यांची रांग दिसून येते.) त्यामुळे ग्राहक आणखी गॅस सिलिंडरची बुकींग करतात. दुसऱ्या वेळेवर मात्र सिलिंडर उपलब्ध करून दिले जाते. दोन्ही वेळची सबसिडी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. दोनदा नोंदणी झाल्याने दोन सिलिंडर लाभार्थ्यास उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र त्याला एकच सिलिंडर दिला जातो. एक सिलिंडरची निश्चितच काळ्या बाजारात दामदुपटीने विक्री केली जात आहे. यातून गॅस एजन्सीधारक कमाई करीत आहेत. ग्राहकाच्या नावे दोनदा सबसिडी जमा होत असल्याने ग्राहकही शांत आहेत. मात्र शासनाला यातून सबसिडीमुळे लाखो रूपयांचा चूना लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
घरपोच सिलिंडर मिळण्यास विलंब
By admin | Published: March 24, 2017 1:02 AM