दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने विश्वशांती विद्यालयाने शाळा सुरू करण्यासाठी दि. १२ जुलैला फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या ग्रामपंचायतीकडे ठरावाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, पण आता पंधरा दिवस झाले, या ग्रामपंचायतीने अजूनही ठराव दिला नसल्याने, त्या गावांतील विद्यार्थी प्रत्यक्षात अजूनही शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन ठराव घेण्याविषयी विनंती केली. मात्र, अजूनपर्यंत ठराव घेण्यात आला नाही.
शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतीकडून विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:37 AM