देसाईगंज शहरातील फव्वारा चौक ते नैनपैर मार्गांवर अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर नियमबाह्य व अनधिकृत पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची काेंडी हाेते. मागणी करूनही अतिक्रमण हटविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. फव्वारा चौक ते जुनी महात्मा गांधी शाळेपर्यंत येथील दुकानदारांनी दोन्ही बाजूंनी १५ ते २० फूट जागेवर अतिक्रमण केले असल्याने ८० फुटांचा असलेला हा रस्ता आजमितीस ३० ते ४० फुटांचाच उरला आहे. दोन्ही बाजूला भाजीपालाविक्रेते ठाण मांडून बसत असल्याने या मार्गांवर तासन्तास वाहतूक खोळंबत असल्याचे वास्तव आहे.
फव्वारा चौक ते थोरात चौकापर्यंतही अशीच स्थिती असून विक्रीचे साहित्य, होर्डिंग्ज रहदारीच्या रस्त्यावर ठेवण्यात येते. तसेच येथील कापड व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने ग्राहक दुकानासमोरच वाहने उभी ठेवतात. त्यामुळे या मार्गांवरुनही आवागमन करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देसाईगंज शहरात मागील अनेक वर्षांपासून नियमबाह्य व अनधिकृत बांधकामे करून मोठ्या प्रमाणात इमारती बांधण्यात आल्या आहेत. संबंधित इमारतीला विद्युत पुरवठा करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र कसे काय देण्यात येते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगर प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करताना कोणताही दुजाभाव न करता शहरातील अनधिकृत व नियमबाह्य इमारती पाडण्याची धडक कारवाई करण्यासह बाजारपेठेच्या मुख्य मार्गांवर करण्यात आलेले नियमबाह्य अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज सिटीझन फोरमने केली आहे. दरम्यान, शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण हे हटविण्यासाठीची कारवाई सोमवारपासून सुरू करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी दिली.