आरमोरी: कोरोनाचे ओढवलेले संकट अंगावर घेऊन आज प्रत्येक जण लढा देत आहेत. कोरोना माणसाला मोकळा श्वास सुद्धा घेऊ देत नाही.चार भिंतीच्या आत बंदिस्त करून माणसाला माणसापासून दूर ठेवत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले कोरोनाचे वादळ अजूनही शमले नाही. या वादळाने आजपर्यंत आपल्या कवेत घेतलेल्या अनेकांच्या चिता दररोज जळताना पाहिल्या आहेत. मात्र आपल्या कुटुंबातील लोकांच्या, नातेवाईकांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा अधिकार ही कोरोनामुळे हिरावला गेला आहे. जिवंतपणी अनेक कठीण संकटाचा सामना करणाऱ्या माणसाला मृत्यूनंतर सुद्धा मरणासन्न यातना भोगाव्या लागत आहेत. सरणावर सुध्दा जाण्यासाठी वेटिंग वर राहावे लागत आहे. किती ही वेदनादायी परिस्थिती. ‘मरण स्वस्त झाले आणि जगणे कठीण, अशा दाहक परिस्थितीत वेदनाही माणसाला जगू देत नाही. तेव्हा वेदनेची अचूक नस पकडणाऱ्या कवी सुरेश भट यांच्या ‘इतकेच मला जाताना,.... सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ वेदनादायी पंक्तीची आठवण होते. हेच भोग कोरोनाने माणसावर आणले आहे.
कोरोनाच्या वैश्विक महामारीने सर्वांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या महामारीने शहरापासून तर खेड्यापर्यंत आक्रमण केल्याने लोकांच्या जगण्याच्या आशाही ढिसाळ होत चालल्या आहेत. परंतु अशाही कठीण परिस्थितीत प्रत्येक जण आलेल्या संकटाचा मोठ्या धाडसाने सामना करून कोरोनाशी लढत आहे. आणि सकारात्मकतेने कोरोनावर मात करीत आहेत.
मागील वर्षीपासून ओढवलेल्या संकटाने लोकांचे जगणे कठिण केले आहे. अनेकांना सळो की पळो, करून सोडले आहे. निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेणारा माणूस आता कृत्रिम ऑक्सिजन घेण्यासाठी धडपडत आहे. पक्षी आकाशात उंच भरारी घेऊन मोकळा श्वास घेत आहेत. तर माणूस मात्र घरात बंदिस्त होऊन बसला आहे. माणूस माणसापासून अंतर ठेवू लागला आहे. प्रत्येक जण भीतीच्या सावटाखालीही मोठया धैर्याने, हिमतीने लढा देत आहे. खबरदारी आणि जबाबदारी यामध्ये ही अंतर पडू लागले. कोरोनाने आजपर्यंत कित्येकांना मृत्यूच्या दाढेत ओढले. तर हजारो लोकांनी कोरोनाशी झुंज देत सकारात्मकतेने विजयही मिळविला. मात्र एन उमेदीच्या काळात अनेकांचे जगणे हिरावल्यामुळे कित्येक कुटुंबातील जगण्याचे आधार कोसळले. अनेक घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब वाऱ्यावर पडले. कुण्या वृद्ध आई वडिलांच्या जगण्याचा आधार हिरावला गेला, कुण्या लहान लेकरांची आई,बाप गेले, कुणाचे पती गेले. आणि उभारलेल्या आयुष्याची, स्वप्नाची पुरती राखरांगोळी झाली. नुसते कोरोनाने हिरावलेच नाही तर त्यांच्या कुटुंबाची वाताहत केली. जिवंतपणी जगण्याच्या आशाही हरपल्या. कित्येक लहान मुले आपला गेलेला बाप परत येईल म्हणून आशाळलेल्या नजरेने बघत आहेत. तर आपला जवान मुलगा गमावलेल्या वृद्ध आईवडिलावर आभाळ कोसळल्याने त्यांचे जगणेच त्यांना वेदनादायी ठरू लागले आहेत.
बाॅक्स
शेवटचा निराेप देण्याचेही भाग्य लाभले नाही
अख्खे कुटुंब रुग्णालयात कोरोनाशी लढत असताना अनेकांना आपल्या कुटुंबाची साथ कायमची सोडावी लागली. रुग्णालयात उपचार घेताना एखादा कुटुंबातील सदस्य गेला तर त्यांना शेवटचा निरोप देण्याचे भाग्यही कुटुंबातील लोकांच्या नशिबात आले नाही. किती हे माणसाचे दुर्दैव, कोरोनाने दररोज लोक मृत्यूच्या दाढेत ओढले जात आहेत. माणसे मरणापूर्वीच सरण रचले जात आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक जण आपल्या नातेवाईकांना अर्ध्यावरीच सोडून जात आहेत. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यास सुध्दा कित्येक नातेवाईक धजावत नाही. माणूस माणसातील माणुसकी, नातेसंबंध हरवून बसला आहे. स्मशानभूमीच्या पोटात व दहनभूमीत एवढी गर्दी झाली की प्रेताला जागा मिळनेही कठीण होऊन बसले आहे. शेवटचा अलविदा ही कुटुंबातील लोकांना दुरूनच करावा लागत आहे.