गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्य रेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रांगी मार्गावर झुडपे
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडूपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते.
वीज तारांना रेटून बांधकाम
देसाईगंज : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्याच्या बाजुला असलेल्या विद्युत तारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष होत चालले आहे. अशा इमारतींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
वाकलेल्या खांब ‘जैसे थे’
आरमोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युत खांबे वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
कचराकुंड्यांची संख्या वाढविण्याची मागणी
आरमोरी : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून प्रशासनाचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे़ शहरातील अनेक अंतर्गत भागात नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत़ तेथे कुंड्या नव्याने ठेवण्यात याव्या, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
थ्री-जी सेवा नावापुरतीच
कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
शाैचालयांची दुरवस्था
आष्टी : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाºयांना प्रचंड त्रास होत आहे. सदर शौचालयांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अधिकाºयांनी लक्ष द्यावे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहन धारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
पांदण रस्ते अतिक्रमणात
ठाणेगाव : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकºयांनी अतिक्रमण केले आहे. वनखी व चामोर्शी माल येथील पांदण रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा येत आहे.
टिपागडला अभयारण्याचा दर्जा द्या
काेरची : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु याकडे दुर्लक्ष आहे.