गडचिरोली : जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
गांधी सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून, याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात.
बायोगॅस अनुदान मिळते ताेकडे
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात गोधन आहे.
सोनसरीत भ्रमणध्वनी सेवा कुचकामी
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे सरल प्रणालीचे ऑनलाईन काम प्रभावित असल्याचे दिसून येते.
हेमाडपंथी शिवमंदिराकडे दुर्लक्ष
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून ४ किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करताना, त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी, पण तसे होत नसल्यामुळे अनेक निवाऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे.
कारवाफा पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा हा मार्ग बंद होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खुल्या डीपी ठरताहेत धोकादायक
देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे धोका
भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगरपंचायतीकडे केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
भंबारा चौकात गतिराेधक बसवा
आलापल्ली : येथील सिरोंचा पुलाजवळ असलेल्या भंबारा चौकात भामरागड, चंद्रपूर, आलापल्ली व अहेरी हे चारही मुख्य मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. मात्र, गतिरोधक नसल्याने या चौकात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी हाेत आहे.
लाइनमनची पदे भरा
एटापल्ली : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. दुर्गम भागातील वीजपुरवठा लवकर सुरळीत हाेत नाही.
गोकुलनगरात साचताहेत कचऱ्याचे ढीग
गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे वाॅर्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.