वीज तारांना रेटून बांधकामामुळे धाेका
कुरखेडा : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत तारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत चालले आहे. अशा इमारतींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
वाकलेले खांब कधी बदलणार
काेरची : तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत महावितरण कंपनीकडे अनेक वेळा तक्रार करण्यात आली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक शाैचालयांची दुरवस्था
चामाेर्शी : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सदर शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
रस्त्यावरील जनावरांमुळे अपघात वाढले
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
अरुंद पुलाचा प्रश्न कायम
गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर - आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत.