वैरागड : वैरागड गावासह आरमोरी तालुक्यात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्नीचा वापर केला जातो. या पन्न्या रस्त्यावर फेकून दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे.
शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
घोट-रेखेगाव मार्गाची दुरवस्था
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मार्गावर अनेक किरकोळ अपघात यापूर्वी घडले आहेत.
प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
आरमोरी : येथून गडचिरोली जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
शहरात डुकरांचा हैदोस वाढला
कुरखेडा : कुरखेडा शहरात डुकरांचा हैदोस प्रचंड प्रमाणात वाढला आहे. नगर पंचायतीचे परिसरातील डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करून शहरातील डुकरांना हाकलून लावावे, अशी मागणी होत आहे.
टिपागडला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी
गडचिरोली : टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़
वन तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभाव
गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळ्यांमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठे उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे.
खरपुंडी मार्ग पथदिव्यांअभावी अंधारात
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात.