भामरागड : तालुका मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी परिसरातील होडरी, गोपणार, लष्कर आदी गावातील नागरिकांना मोठा नाला ओलांडून लाहेरी अथवा भामरागड येथे यावे लागते. पावसाळ्यात नाल्यातून पाच ते सहा फुट पाणी वाहत असते. परंतु या नाल्यावर पूल नसल्याने नागरिकांना लाकडी डोंग्याने धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
होडरी, गोपणार, लष्कर आदी गावे लाहेरीपासून दोन किमी अंतरावर नाल्याच्या पलिकडे आहेत. या गावातील नागरिकांना लाहेरी किंवा भामरागड येथे जायचे असेल तर लाकडी डोंग्याचा आधार घ्यावा लागतो. खोल नदीच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन डोंग्यावर बसून नागरिकांना प्रवास करावा लागतो. डोंग्याशिवाय नागरिकांना पर्याय नसतो. होडरी, गोपणार, लष्कर आदी गावांना जोडण्यासाठी पक्के रस्ते नाही. वीज पुरवठाही नियमित होत नाही.