धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्के खावे लागत आहेत. महामंडळाची बसही या मार्गावरून कशीबशी धावत आहे. सातत्याने मागणी करूनही या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती केली नाही. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शासनाच्या नियोजन शून्यतेमुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. सदर मार्ग रहदारीचा असून, येथून दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली. यापूर्वी परिसरातील काही गावांमध्ये तेंदू हंगामात आवागमन वाढले होते. आधीच हाल झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे.
या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे. या मागणीची दखल घेतली जात नसल्याने राेष आहे.