आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंग ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
दिना धरणाचे खोलीकरण करा
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.
मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावाच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावाची दुरुस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने रस्त्यात वाहन उभे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणात बाधा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी होत आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे.
घोट-रेखेगाव मार्ग उखडला
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधकाचा अभाव
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. बसस्थानकात प्रवासी व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी राहते. गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कमी केला जात नाही.
जि. प. कॉलनीतील घरांची दुरुस्ती करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. मात्र, या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे.
कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर आहेत.
कनेरी, नागेपल्ली दूध शीतकरण केंद्र बंदच
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात अपुरी अग्निशामक व्यवस्था
अहेरी : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १,६४८ गावे आहेत. घटनांच्या वेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहने जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे लक्ष देऊन नगरपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
खुल्या जागांची दैन्यावस्था कायम
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र, काही मोजक्याच जागांना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
गतिरोधक केव्हा लावणार?
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले
एटापल्ली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. तर पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाहीत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
शहरात डुकरांचा बंदोबस्त करा
आलापल्ली : आलापल्ली शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगरपंचायतीचे या डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी शहरातही गेल्या काही दिवसांपासून माेकाट डुकरे व जनावरांचा हैदाेस वाढला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात. मात्र, या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही. स्वतंत्र इमारत बांधण्याची गरज आहे.