पेरीव पद्धतीने भाताची लागवड जून महीन्याचा दुसरा आठवडा ते जुलैच्या १० तारखेपर्यंत करावी. पेरभातासाठी ट्रॅक्टरसहित पेरणी यंत्राचा वापर करावा. दिवसेंदिवस वाढणारे उत्पादन खर्च, चिखलणी व रोवणीचा खर्च कमी करण्यासाठी आवत्याला पर्याय म्हणून पेरीव भाताची लागवड करावी, मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम यांनी केले.
एकरी दहा ते बारा किलो बियाणे वापरावे तसेच दोन ओळीतील अंतर २० सेंटिमीटर ठेऊन पेरणी करावी, बियाणे ५ सेमीपेक्षा खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. तणनियंत्रणसाठी पेंडीमेथीलिंन/ऑक्सिक्लोरोफेन यासारखे घटक असलेले तणनाशके पेरणीनंतर ओलावा असल्यास लगेच फवारणी करून ३० दिवसांनी निंदण करावे. एकरी ४० किलो नत्र २० किलो स्फुरद व २० किलो पालाश प्रति एकर द्यावे. पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र, १०० टक्के स्फुरद व पालाश प्रति एकर द्यावेत. व पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० टक्के नत्र, ६० दिवसांनी उर्वरित ३० टक्के नत्र द्यावे, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे यांनी केले. पेरीव पद्धतीने भात लागवड केल्याने फुटव्याची संख्या वाढून उत्पादनात २५ टक्के वाढ होते. याविषयी कृषी सहायक कुरुड भाग्यश्री दंकोंडवार यांनी मार्गदर्शन केले. टोकन पद्धतीने भात लागवड करण्यासाठी लीलावती वारंभे, शीलाबाई रासेकर व इतर महिला शेतकरी उपस्थित होत्या.