कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात कृषी सेवकापासून ते पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकारी, तर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अशा कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित इत्यंभूत माहिती शेतकऱ्यांना पुरवून मशागत, कीड नियंत्रणाबाबत यथायोग्य माहिती पुरविण्याची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात आली आहे. यासाठी कृषी क्षेत्राशी निगडित ज्ञान असलेल्या व त्याचे शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच या विभागात नियुक्त्या देण्यात येत आहेत. असे असताना मागील कित्येक वर्षांपासून मावा, खोडकिडा, तुडतुडा, तर कधी कडा करप्यामुळे उभे धानपीक नष्ट होण्याचा सिलसिला सुरूच आहे.
शेतकऱ्यांना उपलब्ध हाेणारी बी-बियाणे, रासायनिक खते यांचा योग्य वापर करण्यासंदर्भात कृषी विभागाचे यथायोग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे.