तीन सदस्यीय समिती : बाळ गर्भाशयात दगावल्याचे प्रकरण गडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रसुतीतज्ज्ञ डॉ. प्रविण किलनाके यांच्या दुर्लक्षितपणामुळे अहेरी येथील शमीम सुलतान शेख या महिलेचे बाळ गर्भाशयातच दगावले. या गंभीर प्रकरणाची दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेऊन तीन सदस्यीय विभागीय चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने शनिवारी गडचिरोली येथे येऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली व संबंधित प्रकरणात वैद्यकीय दृष्टीकोणातून आवश्यक असणारे सर्व कागदपत्र ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. सदर समितीत नागपूर येथील सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ. फूलचंद मेश्राम, डागा हॉस्पीटल नागपूरच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, डागा रूग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. विनिता जयंत यांचा समावेश होता. या तिन्ही सदस्यांनी गडचिरोलीत आल्यावर मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या गडचिरोली येथील कार्यालयात जाऊन तक्रारकर्ते व संबंधितांचे बयान नोंदविले. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे जाऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्यासह सामान्य रूग्णालयाच्या प्रसुती व बाल रूग्ण विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे बयान नोंदविले. यावेळी प्रसुती रोगतज्ज्ञ डॉ. प्रविण किलनाके हे उपस्थित होते. गर्भाशयात बाळ दगावल्याच्या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज या समितीच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. या कागदपत्रांचे अवलोकन त्यांनी केले. या समितीतील एका सदस्याने अहेरी येथे जाऊन शमीम सुलतान शेख यांची व त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. डॉ. प्रविण किलनाकेच्या विरूध्द यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही गंभीर स्वरूपाची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी अभय दिल्याने किलनाके यांच्यावर कारवाई झाली नाही. मात्र आता संपूर्ण कारवाई झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असे मुस्लीम वेल्फेअर सोसायटीने म्हटले आहे. मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे आवाहन गडचिरोली सामान्य रूग्णालयातील प्रसुतीतज्ज्ञ डॉ. प्रविण किलनाके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मुस्लीम वेल्फेअर सोसायटीने केली आहे. यापूर्वीही किलनाके यांच्यामुळे अनेक महिलांचे बाळ दगावले आहे. अशा पीडित लोकांनी मुस्लीम वेल्फेअर सोसायटीशी संपर्क साधावा व त्यांच्याही प्रकरणाची तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महंमद मुस्तफा शेख, सचिव अकिल अहमद शेख व कोषाध्यक्ष ए. आर. पठाण यांनी केले आहे.
विभागीय समितीने बयान नोंदवून दस्तावेज घेतले ताब्यात
By admin | Published: January 08, 2017 1:28 AM