बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रांवर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत. त्यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमांना लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यांसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
झिंगानूर परिसरात सिंचन सुविधा तोकड्याच
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर हे आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते. मात्र, सिंचनाअभावी शेतीसुद्धा साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. सिरोंचा तालुक्यात पाणीपातळी अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बोअरवेल किंवा विहीर देण्याची मागणी आहे. तालुक्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.
गडचिराेली शहरात माकडांचा धुमाकूळ
गडचिराेली : शहरात सकाळपासून दिवसभर माकडांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे घरांच्या छतांचे, झाडांचे फळे-फुले, घरावरील गरिबांचे कवेलू व टिनांच्या घरांचे नुकसान होत आहे. शहरात माकडांनी जंगलाची वाट सोडून शहराकडे धाव घेतली आहे. शहरातील प्रत्येक नगरातील नागरिकांना ते त्रासदायक ठरत आहे. परसबागेतील फळझाडे, पेरू, सीताफळ, पपईच्या झाडांचे नुकसान सुरू केले आहे. माकडांची टोळी एकापाठोपाठ एक घरांच्या छपरांवर रांगेत उच्छाद मांडते.
रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच
गडचिराेली : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पंचायत समितीने सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी दिली आहे; पण पदे भरली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
तालुक्यात स्वच्छता मोहिमेचा बोजवारा
चामाेर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, काही उपद्रवी नागरिकांमुळे अभियानाचा बोजवारा उडत आहे.
बँकेसाठी दोन कि.मी.ची पायपीट
कोरची : कोरची येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेची इमारत लहान आहे. अपुऱ्या जागेमुळे ग्राहकांना येथे त्रास सहन करावा लागतो. तसेच गावापासून दोन कि.मी. अंतरावर ही बँक आहे. त्यामुळे पायपीट करीत नागरिकांना बँक गाठावे लागते. त्यामुळे गावातच भाड्याने इमारत घेऊन बँकेची व्यवस्था करावी. कोरचीमध्ये रिक्षा, ऑटो, आदी प्रवासी वाहनांची सुविधा नाही. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास हाेताे.