गडचिरोली: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंगळवारी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलप्रभावित अहेरी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्राणहिता पोलिस उपमुख्यालय येथे नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कार्य केलेल्या शौर्य पदक प्राप्त २६ पोलिस अधिकारी व जवानांचा सत्कार केला.
प्रथम पोलिस स्मृतिस्थळास मानवंदना व पुष्पचक्र वाहून फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार अशोक नेते,आमदार कृष्णा गजबे,आमदार डॉ. देवराव होळी, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे योगदान आहे. पोलिसांच्या शौर्याची बलिदान दखल केंद्र सरकारने घेतली आहे.त्यांचा दीड पट वेतनाचा मार्ग मोकळा करून दिला असून पुढील आदेशापर्यंत तो बंद होणार नाही. पोलिस दलाला कोणतीच कमतरता भासू देणार नसून रराज्य सरकार सदैव सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पोलिस संकुल येथे पोलिस कँटीन,बाल उद्यान,ग्रंथालयाचे उदघाटन त्यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पोलिस विभाग बळकटीकरणासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण केले. त्यांनी अतिदुर्गम भागातील पाच मोबाईल टॉवरचे ऑनलाइन लोकार्पण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कनेक्टिव्हिटीबाबत विचारपूस केली. त्यामुळे ग्रामस्थ भारावून गेले होते.
पोलिसांचे वाढवले मनोधैर्यपोलिस व नक्षल्यांमध्ये नेहमीच धुमश्चक्री होतात. अशावेळी पोलिसांना जीव धोक्यात घालून नक्षल्यांचा सामना करावा लागतो. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कारवाफा या अतिदुर्गम ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस जवानांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांना त्यांनी विविध योजनांची माहिती दिली.