गडचिरोली : निर्भयपणे जगा.. विकासयोजनांचा लाभ घेऊन प्रगती करा.. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांत विश्वास जागवला. जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये सहभागी होत त्यांनी ४ फेब्रुवारीला सकाळी चार किलोमीटर वॉक केला.
जिल्हा पोलिस प्रशासनाकडून येथे तीन दिवसीय ‘गडचिरोली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारपासून शहरात मुक्कामी आहेत. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर रविवारी रविवारी सकाळी सहा वाजता ते ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झाले. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून त्यांनी स्वतः शहरातील रस्त्यावरून चार किलोमीटर वॉक केला. यावेळी मध्यामांसोबत त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, महामॅरेथॉन स्पर्धेत हजारोंच्या संख्येने तरुण- तरुणी सहभागी आहेत. गडचिरोली अशाच पद्धतीने विकासातही धावणार आहे.
आज नवी पहाट उगवली आहे, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यातून आम्ही निर्भय आहोत.नक्षल्यांना घाबरत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.