गडचिरोली : दारूबंदीचे फायदे लक्षात घेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक वाॅर्डातील नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील दारूबंदी काेणत्याही स्थितीत न हटविता दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत देसाईगंजच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांसह संपूर्ण नगरसेवकांनी जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे. तसेच दारूमुक्त निवडणुकीचा संकल्पदेखील केला.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. दारूबंदीमुळे जिल्ह्यातील दारूविक्री व वापर कमी झाला आहे. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा फायदा झालेला आहे. ऐतिहासिक दारूबंदी टिकून राहावी यासाठी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील हजाराहून अधिक गावांनी ठराव घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या दारूबंदीला व येणारी निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी देसाईगंज नगर परिषदेच्या संपूर्ण २१ नगरसेवकांनी समर्थन दिले आहे. राज्य शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहराच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेवक किशन नागदेवे, हरीश मोटवानी, दीपक झरकर, राजू जेठानी, किरण रामटेके, नरेश विठलानी, श्याम उईके, मोहम्मद खानानी, सचिन खरकाटे, गणेश फाफट, मनोज खोब्रागडे, नगरसेविका हेमा कावळे, रिता ठाकरे, आशा राऊत, उत्तरा तुमराम, फहमिदा पठाण, भाविका तलमले, करुणा गणवीर, अश्विनी कांबळे यांनी दारूमुक्त निवडणूक व जिल्हा दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.