अधीक्षकांचे पद रिक्त : सहायक उपधीक्षक रजेवर; रूग्ण वाऱ्यावरलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात अधिपरिचारिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची एकूण २६ पदे मंजूर आहेत. यापैैकी अनेक पदे रिक्त असल्याने कारभार ढेपाळला आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त असून सहायक उपअधीक्षक रजेवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने सध्यास्थितीत एकाच डॉक्टरच्या भरवशावर या रूग्णालयाची आरोग्यसेवा सुरू आहे. विशेष म्हणजे गंभीर रूग्णाला येथून इतर दवाखान्यात रेफर करण्यासाठी महिनाभरापासून रूग्णवाहिकाच उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार येथे सुरू आहे. देसाईगंज येथे ग्रामीण रूग्णालयासाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. या रूग्णालयात ५० बेडची सुविधा उपलब्ध आहे. देसाईगंज ते गडचिरोलीपर्यंतचे अंतर ५० किमी असल्याने सर्वप्रथम बहुतांशी रूग्ण देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात भरती होतात. परिणामी या रूग्णालयात वर्षभर रूग्णांची गर्दी असते. या रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्त आहे. सहायक अधीक्षक व लिपीक यांचे एक पद भरले असून सहायक अधीक्षक रजेवर गेल्याचे सांगण्यात येते. रूग्णांना आरोग्य विभागाकडून सेवा देण्यासाठी येथे अद्यावत यंत्र सामुग्री उपलब्ध आहे. मात्र ही यंत्र सामुग्री हाताळणारी यंत्रणाच या रूग्णालयात नसल्याने आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. देसाईगंज हे या भागातील मध्यवर्ती ठिकाण असून येथील लोकसंख्या जवळपास ३० ते ३५ हजार आहे. सदर रूग्णालयाला महिनाभरापासून रूग्णवाहिका नाही. येथील ग्रामीण रूग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रूग्ण (ओपीडीची) वेळ सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी आहे. परंतु ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही कर्मचारी वेळेवर कर्तव्यावर दाखल होत नसल्याने मनमर्जीप्रमाणे ओपीडी सुरू आहे. पर्यवेक्षिय यंत्रणा रिक्त पदांमुळे खिळखिळी झाली असल्याने रूग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या ओपीडीसाठी रूग्ण सकाळी ८ वाजता उपस्थित राहतात. मात्र येथील डॉक्टर व कर्मचारी तब्बल १ तास उशिरा कर्तव्यावर दाखल होतात. त्यामुळे रूग्णांना प्रतीक्षा करावी लागते, अशी माहिती एका रूग्णाने दिली आहे. मात्र याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. एक्सरे मशीन धूळ खातदेसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी एक्सरे मशीन उपलब्ध करून देण्यात आली. मात्र एक्सरे मशीन हाताळणारा तंत्रज्ञ नसल्याने सदर मशीन निरूपयोगी ठरली असून धूळखात पडून आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील एक्सरे मशीन तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे.
देसाईगंजातील आरोग्यसेवा अस्थिपंजर
By admin | Published: May 23, 2017 12:39 AM