लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. यामुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता गारांसह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० मिनिटे गारांचा पाऊस सुरू होता. सुरूवातीला लहान असलेल्या गारांचा आकार वाढत गेला आणि बोराएवढ्या गारांचा खच रस्त्यावर साचला. देसाईगंज शहराजवळील आमगाव मार्गावरील गॅस गोदाम ते देसाईगंज शहर, कोंढाळा, कुरूड, विसोरा, शंकरपूर या भागात गारपीट झाली. बहुतांश ठिकाणी गारांचा खच जमा झाला होता. प्रवासात असलेल्या नागरिकांचे यामुळे चांगलेच हाल झाले. गारपिटीसोबतच पाऊस व विजाही चमकत होत्या.रबी पिके काढण्याच्या मार्गावर आहेत. अशातच शुक्रवारी गारपीट झाली. यामुळे भाजीपाला व इतर रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गारांमुळे झाडांवरील पाने गळून पडल्याने मोठी झाडे निष्पर्ण झाली आहेत. लाखोळी पीक जमीनदोस्त झाले आहे. गहू, मका ही पिके जमिनीवर झोपली आहेत. टरबुज व उन्हाळी धान पिकालाही फटका बसला आहे. महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. कौलारू घरांवरील कवेलु फुटल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.गडचिरोली, आरमोरी, धानोरा तालुक्यातही रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला.
देसाईगंजला गारांचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:23 PM
देसाईगंज तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. यामुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता गारांसह पावसाला सुरूवात झाली.
ठळक मुद्दे२० मिनिटे बरसल्या : रबी पिकांचे नुकसान