देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ, व्यापारीनगरी तसेच तालुक्याला तिन्ही जिल्हा सीमा व छत्तीसगडकडे जाणारा राज्य महामार्ग यामुळे देसाईगंजला व्यापारीदृष्ट्या महत्त्व आहे. येथे माेठ्या प्रमाणात मालाची ने-आण केली जाते. परंतु वाहने रस्त्याच्या कडेला उभी ठेवून माल उतरविला जाताे. या प्रकारामुळे वाहतुकीची काेंडी निर्माण हाेत आहे.
देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या महामर्गाच्या दोन्ही बाजुला व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. दुतर्फा वाहनांची गर्दी, त्यातच ट्रान्सपाेर्ट व्यवसाय रस्त्यावरच चालत असल्याने वाहतुकीची अडचण निर्माण होत आहे. यापूर्वी या भागात अनेक अपघात झाले आहेत. हुतात्मा स्मारक ते सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह या दरम्यान मुख्य महामार्गावर दुसऱ्या ठिकाणावरुन बुक केलेला माल ट्रान्सपाेर्ट व्यवसायाच्या माध्यमातून शहरात येत असताे. शहरातील सर्वच शाळा, काॅलेज, कार्यालये, दवाखाने ह्याच मार्गावर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा रस्ता गजबजलेला असतो. तसेच बायपासने जाणारी अवजड वाहने याच मार्गाने जात असतात. यापूर्वी विश्राम गृहाजवळ दोन दुचाकीस्वारांची धडक हाेऊन प्राणहानी झाली हाेती. तरीसुद्धा कृत्रित वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या व रोडच्या बाजूला सतत वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज सिटीझन फोरमने केली आहे.