कुरखेडा : वाळवंटातील जहाज संबोधण्यात येत असलेल्या उंटांचा तांडा तालुक्यात दाखल झाला. लहान मुलांसाठी नवल असलेला उंटांचा तांडा बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
गुजरात राज्यातील भटकी जमात असलेल्या या समाजाचा शेळ्या - मेंढ्यांचे पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. वाळवंटी प्रदेशात वैरणाचा मोठा तुटवडा राहात असल्याने वैरणाच्या शोधात वर्षातील आठ महिने हा समाज देशातील विविध राज्यात भटकंती करीत असताे. यावेळी मोठ्या भौगोलिक क्षेत्रात असलेली गडचिराेली जिल्ह्यातील वने व येथील वैरण त्यांना आकर्षित करते. त्यामुळे मोठ्या संख्येत उंटवाल्यांचे तांडे जिल्ह्यासह तालुक्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दाखल होतात. मे आणि जून महिन्यात त्यांचा येथेच मुक्काम असतो. त्यांच्या निवाऱ्यासह दैनंदिन जीवनाकरिता आवश्यक सर्व वस्तू उंटावर लावण्यात येतात. लांब पल्ल्यात पायदळ चालू न शकणाऱ्या लहान बालकांची स्वारीसुद्धा या उंटावर असते. ग्रामीण भागात शेतकरी शेतात शेणखताकरिता आपल्या शेतात उंटांच्या या तांड्यांना बसवितात. यातूनही तांडेवाल्यांना अर्थप्राप्ती होत असते.