लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील बेजूर नजीकच्या कोंगापहाडीवरील बाबलाई मातेच्या पूजा उत्सवाला बुधवारी पहाटेपासून प्रारंभ झाला. याप्रसंगी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. बाबलाई मातेचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाबलाई मातेची यात्रा भरविली जाते. यंदा १ ते ३ जानेवारीपर्यंत ही यात्रा भरविली जात आहे. या यात्रेसाठी मंगळवारपासूनच भामरागड पट्टी गोटूल समिती व सर्व ग्रामसभा, पेरमा, भूमिया, गायता, कोतवाल, मांजी या सर्वांनी एकत्र येऊन यात्रेची तयारी पूर्ण केली. बुधवारी पहाटेपासून पुजेला सुरूवात झाली.बाबलाई मातेच्या यात्रेला जवळपास ५०० वर्षांची परंपरा असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आदिवासींचा जल, जंगल, जमीन व निसर्गाशी अतुट संबंध आहे. बाबलाई मातेला निसर्गाची प्रतिकृतीच मानली जाते. दरवर्षी नवीन धानाचे पीक घेतल्यानंतर येथे भामरागड पट्टीतील सर्व नागरिक एकत्र येऊन सामूहिकरित्या सर्वप्रथम बाबलाई मातेची पूजा करतात. त्यानंतरच नवीन धानाचा आहारात वापर केला जातो. मोहफूल गोळा केल्यानंतर बुर्री पंडुम, आंब्याच्या हंगामात मरकजत्रा पंडुम तसेच कोणतेही नवीन पीक, विशेषत: धान पीक घेतल्यानंतर नवा पंडुम केल्या जाते. शिवाय पावसाळ्यात धान रोवणी करण्यापूर्वी वीजा पंडुम केले जाते. त्यानंतरच रोवणीला सुरूवात होते. देवीच्या मंंदिर परिसरात १९४८ मध्ये येथे एक विहीर खोदण्यात आल्याचे नागरिक सांगतात. यंदाच्या तीन दिवसीय बाबलाई यात्रेत अनेक भाविक शिधा घेऊन दाखल झाले आहेत. झाडाखाली राहून तीन दिवस भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. रात्री रेला व नृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच गुरूवारी भामरागड पहाडावर गडीपूजा होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
बाबलाई यात्रेसाठी बेजूरच्या जंगलात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:47 PM
तालुक्यातील बेजूर नजीकच्या कोंगापहाडीवरील बाबलाई मातेच्या पूजा उत्सवाला बुधवारी पहाटेपासून प्रारंभ झाला. याप्रसंगी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. बाबलाई मातेचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.
ठळक मुद्देआज समारोप : तालुक्यातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल