देसाईगंज : देसाईगंज नगरपालिकेत जून महिन्यात नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. नगर विकास मंत्रालयाने काढलेल्या आरक्षणानुसार नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे एकमेव सदस्य असलेल्या भाजपच्या श्याम उईके यांच्या गळ्यात ही माळ पडणार आहे. मात्र उपाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच भाजपच्या गोट्यात सध्या सुरू आहे. तत्कालिन चंद्रपूर जिल्ह्यात १ मे १९६१ ला स्थापन झालेली देसाईगंज ही विदर्भातील जुनी नगरपालिका आहे. जिल्हा निर्मितीनंतर नगरपालिकेच्या माध्यमातून देसाईगंज शहराच्या विकासाला चालणा देण्यात आली. २0१२ च्या डिसेंबरमध्ये देसाईगंज नगरपालिकेची निवडणूक झाली. काँग्रेसची सत्ता जावून भारतीय जनता पार्टी नगरपालिकेच्या राजकारणात विराजमान झाली. १७ सदस्यीय नगरपालिकेत भाजपचे १0 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ६ व राष्ट्रवादी काँग्रेसचा १ नगरसेवक आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपने नगराध्यक्ष म्हणून किसन नागदेवे यांची निवड केली होती व उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर सुंदरकर यांची निवड करण्यात आली होती. या दोघांचाही कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकीय गोटात नव्या न. प. उपाध्यक्ष पदाच्या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. भाजपला या नगरपालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने उपाध्यक्ष पदासाठी नगरसेवक विलास साळवे व भाजपचे ज्येष्ठ नेते मोतीलालजी कुकरेजा यांचे नाव आघाडीवर आहे. साळवे हे भाजपचे जुने कार्यकर्ते असून तिसर्यांदा ते नगरपालिकेत निवडून आले आहे. भाजपच्या देसाईगंज येथील जुन्या गटालाही ते मान्य होणारे आहेत. विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या मर्जीतील असलेल्या विलास साळवे यांच्यावर न. प. उपाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षाच्या अंतर्गत गोटात दिसून येत आहे. मात्र भाजपचा देसाईगंज येथील दुसरा गट मोतीलालजी कुकरेजा यांच्यासाठी आग्रही आहे. मोतीलालजी कुकरेजा हे देसाईगंज नगरपालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेले आहे. नगराध्यक्षपदी किसन नागदेवे यांची गेल्यावेळी निवड झाल्याने मोतीलाल कुकरेजा यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी उपाध्यक्ष पदावर त्यांनी खंबीर दावा केला आहे. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देसाईगंज शहरात भाजपची सत्ता असूनही भाजप उमेदवाराला केवळ १४00 मताची आघाडी मिळविता आली. भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी पक्षाचे कामच केले नाही, असा आरोप आता होऊ लागला आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हास्तरावरील नेतेही यावेळी देसाईगंज नगरपालिकेच्या निवडणुकीत विशेष लक्ष घालून आहेत. साळवे हे बहुजन समाजाचे असल्याने त्यांना संधी दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. मात्र १0 नगरसेवकांपैकी साळवे यांच्या बाजुने किती नगरसेवक राहतील ही बाब अद्याप गुलदंस्त्यात आहे. एकूणच आगामी निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी देसाईगंज नगरपालिकेत सध्यातरी घमासाण सुरू असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे देसाईगंज नगरपालिकेत ६ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेस कुठल्याच परिस्थितीत निवडणुकीसाठी सक्षमपणे उतरू शकत नाही. भारतीय जनता पार्टीलाच या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासमोरही कोणाच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ टाकायची यावरून कमालीची चुरस निर्माण झाली आहे. यापूर्वी देसाईगंज नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असतांनाही मोठय़ा प्रमाणावर विकास कामे झालीत. त्या तुलनेत गेल्या अडीच वर्षात नगरपालिका विकास कामाच्या धडाक्यातही बरीच माघारलेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी लागणारा अनुसूचित जमातीचा नगरसेवक भाजपकडेच असल्याने उपाध्यक्ष पदासाठी मात्र यावेळी जोरदार रस्सीखेच दिसत आहे.
देसाईगंजात उपाध्यक्षासाठी चुरस
By admin | Published: May 29, 2014 2:22 AM