नगर पंचायत सुस्त : मंगल कार्यालयातील शिळे अन्न व घाणपाणी रिकाम्या भूखंडात लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून सुंदर व स्वच्छ शहर करीत असल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र आरमोरी नगर पंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व दुर्लक्षितपणामुळे आरमोरी शहराच्या अनेक वॉर्डात स्वच्छ भारत मिशनचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. विशेष म्हणजे येथील नंदनवन कॉलनीत लगतच्या साई दामोधर मंगल कार्यालयातील उरलेले शिळे अन्न, घाणपाणी सर्रास सोडले जात आहे. परिणामी या रिकाम्या भूखंडात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिक प्रचंड त्रासले आहेत. यासंदर्भात नंदनवन कॉलनीतील नागरिकांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, साई दामोधर मंगल कार्यालयात लग्न समारंभ व मोठे कार्यक्रम होत असतात. जेवनावळी आटोपल्यानंतर टाकाऊ अन्न, प्लास्टिकचे टाट, वाट्या, ग्लास आदी वस्तू लगतच्या रिकाम्या भूखंडात सर्रास फेकले जात आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. दुर्गंधी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नगर पंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकास नोटीसही बजावली नाही. २२ मे रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजय काळबांधे, डी.के. बोरकर, कुशल तारगे, देविदास चहेले, गोपाल नंदनवार, अनंता खरवडे आदींसह नंदनवन कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आरमोरी शहराच्या विविध वॉर्डात मोठ्या प्रमाणात रिकामे भूखंड आहेत. शिवाय अनेक ठिकाणी नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाणी रिकाम्या भूखंडात साचून राहते. आरमोरी शहरातील अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. आरमोरी शहरातील समस्यांबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी नगर पंचायतीला यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. मात्र नगर पंचायत प्रशासन याबाबत सुस्त आहे. नगर पंचायतीला प्राप्त झालेल्या नव्या घंटागाड्या तशाच पडून आहेत. घंटागाड्या निरूपयोगी ठरल्या आहेत. चौकशी करून कारवाई करा दामोधर मंगल कार्यालयातील घाणपाणी व टाकाऊ अन्न पदार्थामुळे नंदनवन कॉलनीतील लोकांना त्रास होत आहे. यासंदर्भात नगर पंचायतीने मोका चौकशी करून उचित कारवाई करावी, अशी मागणी नंदनवन नगर कॉलनीतील रहिवासी अजय काळबांधे यांनी मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे केली आहे.
अस्वच्छतेने नागरिक हैराण
By admin | Published: June 07, 2017 1:23 AM