तोडसा आश्रमशाळा : विज्ञान शाखा बंद करण्याचा घातला घाटएटापल्ली : तालुक्यातील एकमेव निवासी मुलींची आश्रमशाळा असलेली शासकीय आश्रमशाळा तोडसाची दयनिय अवस्था असून येथे एकही महिला कर्मचारी नाही. हालेवारा येथील महिला अधीक्षिकेकडे तोडसा येथील पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे मुलींच्या देखभालीची जबाबदारी रामभरोसच आहे. तोडसा येथील मुलींच्या शाळेत वर्ग पहिला ते बारावीपर्यंत ४४९ विद्यार्थी शिक्षण घेतात. मंजूर असलेल्या १६ शिक्षकांच्या पदांपैकी १५ पदे भरलेले आहेत. या एकही महिला शिक्षक नाही. शासन धोरणानुसार मुलींच्या शाळेत ७५ टक्के महिला शिक्षक कार्यरत असणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवित येथे एकही महिला कर्मचारी दिलेला नाही. निवासी मुलींची देखभाल करण्याकरिता हालेवारा येथील महिला अधीक्षिकेची तात्पुरती व्यवस्था केली. त्या महिला अधीक्षिका काही कामानिमित्त रजेवर असल्यास त्याकाळात प्रभार सोपविण्यासाठी महिला शिक्षिका नाही. त्यामुळे पर्यायी पुरूष शिक्षकांवर मुलींची जबाबदारी येऊन पडते. मुलींच्या निवासाकरिता वेगळ्या वसतिगृहाची येथे व्यवस्था नाही. भोजन व्यवस्थेकरिता विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात बसून भोजन करावे लागते. कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखा आहे. परंतु विज्ञान शाखा या वर्षी बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाकडून तशा हालचाली सुरू झाल्या आहे. ही शाखा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे. या शाळेतील काही विद्यार्थी नामांकित शाळेत पाठविण्याबाबतही हालचाली सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुलींची शाळा असूनही महिला कर्मचारी नाही
By admin | Published: August 05, 2015 1:35 AM