मागील वर्षी कढाेली धान खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांचा बारदाना धान खरेदीसाठी वापरण्यात आला. शेतकऱ्यांना प्रति बारदाना २० रुपये प्रमाणे पैसे त्यांना मिळतील असे आदिवासी संस्थांच्या खरेदी केंद्राकडून सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी ३५ रुपये प्रतिनग बारदाना खरेदी करून ताे आदिवासी विकास महामंडळाला दिला. या बाबीला आता वर्षभराचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र वर्ष लोटूनदेखील बारदान्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाही. चालू खरीप हंगामातदेखील आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केंद्रावर अल्प प्रमाणात बारदाना पुरवण्यात आला. २० मार्चपर्यंत खरीप हंगामातील धान खरेदी करण्याची शेवटची तारीख असली तरी अजूनही अनेक केंद्रांवर मोठ्या प्रमाणात धान उघड्यावर पडून आहे. धान उचल करण्याचा परवाना तयार करण्यात आला नाही. याबाबत आरमोरी उपप्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या व्यवस्थापकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला; पण अजूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. धान उचल करण्याचा परवाना तत्काळ बनवण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.
पाठपुरावा करूनही बारदानाचे पैसे मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:38 AM