बुर्कमलमपल्ली गावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव संघटना, पोलीस पाटील व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या गाव परिसरात अहिंसक कृती करीत मोहसडवा नष्ट करण्याची माेहीम सुरू केली. सोबतच गावात सक्रिय असलेल्या दारू विक्रेत्यांना नोटीस बजावली होती. मात्र, गावातील काही दारू विक्रेत्यांनी नोटीसची पायमल्ली करीत आपला गोरखधंदा सुरूच ठेवला. यामुळे गावातील नागरिकांसह परिसरातील गावे त्रस्त झाली होती. या दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने नियोजन केले. त्यानुसार अहेरी पोलीस, मुक्तिपथ तालुका चमू, गाव संघटना, बचत गटाच्या महिलांनी एका घराची तपासणी केली. यावेळी घर परिसरात दोन ड्रममध्ये जवळपास १०० लिटर मोहसडवा व दोन लिटर दारू आढळून आली. घटनास्थळावर संपूर्ण मोहसडवा, साहित्य नष्ट करीत दारू विक्रेत्या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, बीट अंमलदार राजकुमार शहारे,धर्मानंद मेश्राम, मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, प्रेरक मारोती कोलावार यांनी केली.
दरम्यान अहेरीचे पोलीस निरीक्षक डांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. गावात पुन्हा दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक डांगे यांनी दारू विक्रेत्यांना सांगितले. यावेळी गाव संघटना सदस्य, बचत गटाच्या महिला, पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.
बाॅक्स
किरकाेळ दारू विक्रीचा धंदा जाेमात
अहेरी तालुक्यातील काही गावांमध्ये दारू गाळून किरकाेळ दारू विक्रीचा धंदा जाेमात सुरू आहे. या व्यवसायात अनेक युवा गुंतले आहेत. तालुक्यात माेहफूल माेठ्या प्रमाणात संकलित केले जाते. मात्र प्रक्रिया उद्याेग नसल्याने अनेक नागरिक दारू गाळणाऱ्यांना माेहफुलाची विक्री करतात. त्यामुळे ग्रामीण भागात सर्रास माेहफूल दारू गाळून विक्री केली जाते. गावागावात संघटनांच्या माध्यमातून कारवाई केली जात असली तरी पाेलिसांनी कठाेर कारवाई करण्याची गरज आहे.