लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा पोलिसांनी अवैध मोहफूल हातभट्टीच्या विरोधात धडक मोहीम राबवित शुक्रवारी तालुक्यातील वाकडी येथील सात व मोहगाव येथील एक अशा एकूण आठ हातभट्ट्या धाड टाकून उद्ध्वस्त केल्या. येथून १४५ लीटर मोहफूल दारू व १२० लीटर सडवा जप्त करून १४ आरोपींविरोधात कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी व मोहगाव परिसरातून शहरात दारूचा पुरवठा होत असतो. परिणामी या भागातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडीलगत सुरू असलेल्या हातभट्टीवर धडक टाकली. येथून १० लीटर दारू व २० लीटर सडवा, असा एकूण ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर मुद्देमाल आरोपी बैद्यनाथ देशमुख, रोहित देशमुख व अर्चना देशमुख यांच्या मालकीचा आहे. ओमप्रकाश गायकवाड व मनीषा गायकवाड यांच्याकडून सदर भट्टीतून १५ लीटर दारू व २० लीटर मोहसडवा असा एकूण ८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुलोचना राऊत, दीपक राऊत यांच्या भट्टीतून सुद्धा २० लीटर दारू व २० लीटर मोहसडवा जप्त करण्यात आला. याची किंमत ७ हजार २०० रुपये आहे. हेमंत गायकवाड, मोहन उईके, उमेश उईके, गणेश गायकवाड यांच्या भट्टीतूनही दारू व सडवा जप्त करण्यात आला. तसेच मोहगाव येथे धाड टाकून ३ हजार रुपयांची ३० लीटर दारू जप्त करण्यात आली. यातील सदानंद नैताम, नितीन नैताम व वर्षा नैताम या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरखेडा पोलिसांनी १४ आरोपींकडून मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पारधी, हवालदार उमेश नेवारे, कैलास रामटेके, नितीन नैताम, वाकडी येथील दारूबंदी समितीचे सदस्य किसन उईके, चंद्रलेखा नैताम आदींनी केली.
आठ हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 AM
तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी व मोहगाव परिसरातून शहरात दारूचा पुरवठा होत असतो. परिणामी या भागातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडीलगत सुरू असलेल्या हातभट्टीवर धडक टाकली. येथून १० लीटर दारू व २० लीटर सडवा, असा एकूण ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ठळक मुद्दे१४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल । मोहफूल दारू व सडवा जप्त