गडचिरोली : तालुक्यातील मेंढा-अलोणी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत दोन दारू अड्डे उद्ध्वस्त केले. सोबतच दारूविक्रेत्यांनी टाकलेला नऊ क्विंटल मोहसडवा नष्ट केला. मागील अनेक दिवसांपासून अलोणी गावात माेहफूल दारू गाळून विक्री केली जात हाेती. त्यामुळे निर्ढावलेल्या दारूविक्रेत्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई केली.
मेंढा-अलोणी या गावात दारूचा महापूर आहे. अलोणीत ३० ते ४० दारूविक्रेते सक्रिय आहेत. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगाटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरातसुद्धा दारू पुरविली जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाली आहेत. भांडण-तंट्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या जात हाेत्या. गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या अलोणी येथील जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबवित दोन दारू अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच विविध ठिकाणी टाकलेला ६३ हजार रुपये किमतीचा नऊ क्विंटल मोहसडवा नष्ट केला. यामुळे दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने ॲक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू आहे. मुजोर गावातील दारूविक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील दारूविक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार प्रभाकर भेंडारे, हवालदार शकील सय्यद, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
बाॅक्स
जानमपल्लीत ३०० लिटर मोहसडवा नष्ट
सिराेंचा तालुक्यातील जानमपल्ली (माल) येथील राजीवनगर वाॅर्डात सिरोंचा पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या कारवाई करीत ३०० लिटर मोहसडवा व दोन लिटर दारू नष्ट केली. याप्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात तिरुपती कोंडागुर्ला (वय ४२) या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जानमपल्ली येथे अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस व मुक्तिपथ चमूने संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे नियोजन केले. त्यानुसार एका ठिकाणी छापा टाकला असता जमिनीत गाडलेल्या ड्रममध्ये मोहसडवा असल्याचे दिसून आले. एकूण ३०० लिटर मोहसडवा व दोन लिटर दारू असा एकूण १२ हजार ४०० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार मारा मडावी, वासुदेव तोरे व मुक्तिपथ तालुका चमूने केली.