गडचिरोली : तालुक्यातील मुरूमबोडी-बोथेडा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवून दारूच्या अड्ड्यावर सापडलेला दोन क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट केले. अवैध दारूविक्रेत्यांविरोधात ॲक्शन प्लॅननुसार कृती सुरू असून विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुरूमबोडी व बोथेडा या दोन्ही गावांत दारू विक्रेते सक्रिय आहेत. जंगलाचा आसरा घेत दारू गाळली जाते. गावात विक्रीसोबतच परिसरातील गावांतसुद्धा येथूनच दारूचा पुरवठा केला जातो. दारूविक्री बंद असलेल्या गिलगाव, खुर्सा, अमिझा, धुंडेशिवनी, भिकारमौशी, आंबेटोला, आंबेशिवणी या गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सभोवतालच्या गावांनी वारंवार सांगूनसुद्धा दोन्ही गावांतील मुजोर दारूविक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. या विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी गडचिरोली पोलीस व मुक्तिपथने संयुक्त कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, सापडलेला दोन क्विंटल मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार अशोक कुमरे, पोहवा शकील सय्यद, मुक्तिपथ संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.