अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून मक्याची ओळख आहे. सिंचनाची साेय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी मक्याची लागवड केली आहे. महागावातील शेतकरी नामदेव मसाजी अलाेणे यांनी तीन एकरांत मक्याची लागवड केली आहे. पीक जाेमात वाढत असतानाच रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे हैदाेस माजवत आहेत. अलाेणे यांचे जवळपास एका एकरातील पीक डुकरांनी नष्ट केले. त्यामुळे त्यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वन विभागाने नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी अलाेणे यांनी केली आहे.
वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना कुंपणासाठी काटेरी तारांचा पुरवठा करावा, अशी मागणीही नामदेव अलाेणे यांच्यासह महागाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.