गडचिरोली : दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांसाठी ‘मुक्तिपथ’ अभियानातर्फे तालुका व गावपातळी शिबिराच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. अहेरी, चामोर्शी व सिरोंचा येथील तालुका कार्यालयात शुक्रवारी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ४२ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना लवकरच शारीरिक दुष्परिणाम दिसून येतात. त्या रुग्णाला उपचार घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक असते. पूर्ण उपचार घेतलेल्या रुग्णांना दारूमुक्त होण्यास मदत मिळत असते. यासाठीच मुक्तिपथ अभियानाद्वारे शिबिरांचे आयोजन केल्या जाते. शुक्रवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी आलापल्ली शहरातील होंडा शोरूमजवळील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २७ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. सिरोंचातील रामाराव दुधीवार यांच्या घरी असलेल्या तालुका कार्यालयात ५ चामोर्शी येथील पोस्ट ऑफिसजवळील कार्यालयात १० रुग्णांवर उपचार करण्यात आले. या तीन तालुक्यांत आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ४२ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. सोबतच रुग्णांना समुपदेशन करण्यात येते. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. मुक्तिपथ तालुका कार्यालयांमध्ये ठराविकदिवशी क्लिनिकचे आयोजन केले जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणा-या जास्तीत-जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.