अहेरी : तालुक्यातील देवलमरी गट ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लाेकार्पण जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ग्रा.पं.ला नवीन इमारत मिळाल्याने नागरिकांची अनेक दिवसापासूनची मागणी पूर्ण झाली.
देवलमरी गट ग्रामपंचायत अंतर्गत मौसम, काटेपली, कोलपली, नंदिगाव व देवलमरी आदी गावांचा समावेश आहे. परंतु येथे ग्रामपंचायत भवन नव्हते. विविध कामे व बैठका घेण्यासाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. याबाबत नागरिकांनी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली हाेती. जि.प.अध्यक्षांनी ग्रामपंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर नवीन ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करण्यात आले.
इमारत लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे पं.स. सभापती भास्कर तलांडे होते. यावेळी संवर्ग विकास अधिकारी चन्नावार, विस्तार अधिकारी रायपुरे, ग्रा.पं. सदस्य हरीश गावडे, श्रीनिवास राऊत, माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट, तंमुस अध्यक्ष बायका तेलकुंटवार, जगन्नाथ मडावी, संजय गोंडे, प्रशांत गोडसेलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी बानाईत, सूत्रसंचालन ग्रामसेवक निमगडे यांनी केले. यावेळी नागरिक उपस्थित हाेते.