काेरची : तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील युवकांनी दररोज व्यायाम करून आरोग्य निराेगी ठेवावे तसेच खेळातून आपला विकास साधावा, असे प्रतिपादन तहसीलदार सी. आर. भंडारी यांनी केले.
कोरचीपोलीस ठाण्याच्या वतीने काेरची येथे जनजागरण व आरोग्य मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य राखीव पाेलीस दलाचे पोलीस निरीक्षक मोतीलाल मोरे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून विजय बुल्ले, कृषी अधिकारी अनंत बेलूरकर, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक आर. नरोटे, रुपेश भैसारे, प्रमोद सातपुते, अनिकेत भांडारकर, मुख्याध्यापक प्रभाकर दहिवले, मुख्याध्यापक शालिकराम कराळे, राहुल अंबादे, के.एस.सहारे, के.जे.जुमनाके, के. जी. साहू आदी उपस्थित होते.
इंदिरा आवास योजना, श्रावणबाळ योजना, जात प्रमाणपत्र वाटप, बालसंगोपन योजना माहिती, बस प्रवास सवलत माहिती, संजय गांधी निराधार योजना, अशा विविध योजनांची माहिती डॉ.स्वप्निल राऊत, रुपेश भैसारे, विजय बुल्ले पाेलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांनी दिली. यावेळी नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना कृषी याेजनांची माहिती देण्यात आली.
प्रास्ताविक पाेलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तर सूत्रसंचालन मेजर ठाकरे यांनी केले.
बाॅक्स....
व्हाॅलिबाॅल व कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
जिल्हा पोलीस व कोरची पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने कोरची येथे एकदिवसीय वीर बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धा व वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन कोरची पोलीस ठाण्याच्या मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना या मेळाव्यात रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये कबड्डी स्पर्धेतील प्रथम विजेते जय गढ माता दी बोंडे, द्वितीय हितकसा गावच्या समूहाला तर तृतीय कुंभकोट गावच्या समूहाला मिळाले. व्हाॅलिबॉल स्पर्धेत प्रथम आलेल्या आय टी आय कोरची टीमला व्हॉलिबॉल किटसह तीन हजार रोख बक्षीस तहसीलदार सी.आर.भंडारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर द्वितीय बक्षीस ऑल फ्रेंड्स ग्रुप कोरची, तृतीय मयालाघाट गावातील चमूला मिळाले.