अरविंद घुटके।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते. ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला, त्या जागेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी, दीक्षाभूमी असे संबोधले जाते. शासनान जागा आरक्षित केली असली तरी या ठिकाणाचा विकास केला नाही. या ठिकाणी केवळ एक विहाराची इमारत, बाबासाहेबांचा पुतळा बांधण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आले होते. त्याकाळात देसाईगंज हे दलित चळवळीचे केंद्र बनले होते. २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशाल जनसमुदायाला संबोधित केले होते. १४ एकर जागेचा प्रांगण नागरिकांच्या वतीने फुलून गेला होता. जागा मिळत नसल्याने घराच्या छतावर बसून बाबसाहेबांचे भाषण ऐकले होते. ज्या जागेवर बाबासाहेबांची सभा झाली, त्या जागेला सभेनंतर पदस्पर्श भूमी असे संबोधल्या जाऊ लागले. बाबासाहेबांच्या पश्चात २७ मे १९५८ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी याच भूमीवर लाखो नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून या भूमीला दीक्षाभूमी असे संबोधले जाऊ लागले. याबाबीला आता ६४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. दलित समाजाची मते घेण्यासाठी अनेक राजकीय पुढाºयांनी दीक्षाभूमीचा विकास करण्याची आश्वासने दिली आहेत. मात्र ही आश्वासने प्रत्यक्षात अजूनपर्यंत उतरली नाही. दीक्षाभूमीच्या नावावर १४ एकर जागा आहे. मात्र प्रत्यक्षात ४.६८ एवढीच जागा आता शिल्लक आहे. उर्वरित जागा गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.शिल्लक असलेली जागा तरी ताब्यात मिळावी, यासाठी स्थानिक महिलांनी पुढाकार घेतला आहे. दीक्षाभूमीचा विकास होण्यासाठी १९८३ साली सम्यक जागृत बौद्ध महिला समितीची स्थापना झाली. दीक्षाभूमीच्या विकासाकरिता सदर समितीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत अनेकदा यासाठी पाठपुरावा केला. समिती अस्तित्वात येऊन आज ३५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र दीक्षाभूमीचा विकास झाला नाही. दीक्षाभूमीच्या जागेवर केवळ बाबासाहेबांचा पुतळा, एक लहानसा विहार व एक विहीर एवढेच बांधकाम आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनभावना लक्षात घेऊन दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.विद्यमान सामाजिक न्यायमंत्र्यांकडून अपेक्षादीक्षाभूमीवर पदस्पर्श दिनाच्या निमित्ताने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही २९ एप्रिल रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले येणार आहेत. भाषणादरम्यान दीक्षाभूमीच्या विकासाबाबत निश्चितच घोषणा करतील. मात्र यापूर्वी अनेक नेत्यांकडून झालेल्या घोषणा ऐकून येथील नागरिकांचे कान किटले आहेत. त्यामुळे घोषणेबरोबरच प्रत्यक्ष बांधकामाची अपेक्षा येथील जनता करीत आहे.या कार्यक्रमाला आ. कृष्णा गजबे, आ. जोगेंद्र कवाडे, सीआरपीएफचे कमांडंट त्रिपाठी, नगराध्यक्ष शालू दंडवते, रोहिदास राऊत, मोतीलाल कुकरेजा, नाना नाकाडे, किसन नागदेवे, अशोक गोटेकर, बाळू खोब्रागडे, माजी आ. आनंदराव गेडाम, मारोतराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन भूमीचा विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:45 AM
दीन दलित व बहुजन समाजाला विकासाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे सभा घेऊन उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले होते.
ठळक मुद्दे२९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांनी दिली होती भेट : केवळ एक विहार व बाबासाहेबांच्या पुतळ्यावरच बोळवण