प्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : गोविंदगाव येथे साहित्य वितरणअहेरी : दुर्गम व ग्रामीण भागातील अशिक्षित जनता आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठविण्यास तयार होत नाही. मात्र याचे गंभीर परिणाम पुढील पिढीलाही भोगावे लागणार असल्याने प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले. जिल्हा पोलीस दल व मैत्री परिवार संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथे शुक्रवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रंचित पोरेड्डीवार बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव होते. मेळाव्याचे उद्घाटन मैत्री परिवार संस्थाचे अध्यक्ष संजय भेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, गोविंदगावच्या सरपंच शंकरी पोरतेट, यावलकर, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अनिल बोबडे, साखरकर तसेच मैत्री परिवारातील ३० सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान २२० आदिवासी महिलांना नवीन साड्या, फराळाचे वितरण करण्यात आले. सदर मेळाव्याला गोविंदगाव परिसरातील ५०० पेक्षा अधिक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व उपपोलीस स्टेशन जिमलगट्टा यांच्या वतीने करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
शिक्षणानेच पुढील पिढीचा विकास
By admin | Published: November 06, 2016 1:29 AM