गडचिरोली : सिरोंचा येथील प्राणहिता नदीकाठी सुरू असलेल्या पुष्कर मेळ्याच्या ११ व्या दिवशी (दि.२३) भाविकांची मोठी वाढ झाली. याचवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या लोकांनी उपस्थिती दर्शविली.
सिरोंचा येथे पुष्करनिमित्त विविध राज्यांमधून लाखावर भाविकांनी आतापर्यंत उपस्थिती दर्शविली आहे. पवित्र स्नानासाठी दर १२ वर्षांनी भरणाऱ्या पुष्कर मेळाव्याची सांगता रविवारी (दि.२४) होणार असल्याने भाविकांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. प्रशासनाकडून तातडीने आवश्यक सर्व सोयीसुविधा सिरोंचा येथील दोन्ही घाटावर उभारण्यात आल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विशेष निधी मंजूर केला होता. भाविकांना अडचणी येऊ नयेत म्हणून सावली निर्माण करण्यापासून ते जाण्यायेण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था उभारण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या सोयी सुविधामूळे भाविकांची पसंती सिरोंचा घाटाला मिळाली.
फडणवीस यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन
आयुष्यमान भारतअंतर्गत नागरिकांसाठी तालुकास्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील आरोग्य शिबीराचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.