गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ ५ जुलै रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. जिल्हा निर्मितीनंतर राष्ट्रपतींचा पहिलाच गडचिरोली दौरा होता. विशेष म्हणजे राष्ट्रपती झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच राज्यात आल्या. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने भाजप- शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा दिला. या सत्तानाट्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीत विमानतळासाठी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील लोहखनिजासह इतर वनउपजांचा आवर्जून उल्लेख करत येथे उद्योगांना तसेच विकासाला वाव असल्याचे सांगितले. जिल्ह्यात नक्षल्यांचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे वनउपजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारता येतील. यातून अनेकांना रोजगार मिळेल, शिवाय विमानतळासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत, असे सांगितले. गोंडवाना विद्यापीठातून शिक्षणाच्या संधी आहेत, या विद्यापीठाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्याच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी या जिल्ह्यासाठी अनेक कामे मंजूर केल्याचा उल्लेख केला. लोहप्रकल्पामुळे येथे गुंतवणूक वाढणार आहे. यासाठी रेल्वे येणे आवश्यक असून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंडवानाचे नाव जागतिक स्तरावर जाईल : राष्ट्रपती
गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी व मागास विद्यार्थ्यांना शिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. याचा फायदा घेऊन प्रगती करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर जाईल, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चालना दिल्याचा उल्लेख केला.
व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याने शहराला छावणीचे स्वरुप
दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रपतींसह राज्यपाल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ.विजयकुमार गावित तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे व्हीआयपी नेते जिल्ह्यात आले होते. त्यामुळे ४ जुलैपासूनच पोलिसांनी सुरक्षेसाठी शहराला जोडणाऱ्या चारही मार्गांवर नाकाबंदी केली होती. वाहनांची कसून तपासणी केली. कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले होते. रस्त्यावर जागोजागी पोलिस तैनात होते.
दोन ठिकाणी कसून झाडाझडती...
कार्यक्रमस्थळी एक हजार जणांनाच प्रवेश होता. प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. मुख्य प्रवेशद्वारासह शामियानात प्रवेश करतानाही झाडाझडती घेतली जात हाेती. महिलांना पर्स आत नेण्यास मज्जाव केला होता. सर्व पर्स प्रवेशद्वारावरच ठेवल्या होत्या.