गडचिरोली शहरात, नगर परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मूर्तिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती एकाच ठिकाणी विक्रीस ठेवण्याबाबत ठरविण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानासमोरील खुल्या मैदानावर मोठा पेंडाल उभारून मातीच्या गणेशमूर्ती विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. शहरात पीओपीच्या मूर्ती निर्मितीवर व विकण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेविका वैष्णवी नैताम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. डांगे, विलास निंबोरकर, प्रशांत नैताम, मूर्तिकार संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष कपाट, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, मूर्तिकार, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.