गडचिराेली : स्थानिक विधानसभा क्षेत्राचे आ. डाॅ. देवराव हाेळी हे सलग दाेनवेळा निवडून आले आहेत. दाेन टर्ममधील त्यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण हाेत आहे. यानिमित्त त्यांनी ‘९ वर्ष विकासाचे, जनकल्याणाचे, प्रगतीचे’ असे पत्रक तयार करून स्वत:ची पाठ थाेपटून घेतली आहे. मात्र, यात नमूद काही कामे माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी यांच्या कार्यकाळातील असल्याने नव्या श्रेयवादाला ताेंड फुटण्याची शक्यता आहे.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एसटीचे विभागीय कार्यालय आहे. गडचिराेली हे अपवाद हाेते. चंद्रपूर येथे विभागीय कार्यालय असल्याने लहान-माेठ्या कामांसाठी चंद्रपूर येथे जावे लागत हाेते, ही बाब लक्षात घेऊन गडचिराेली येथे विभागीय कार्यालय व्हावे, यासाठी माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्याच कालावधीत सदर कार्यालय मंजूर झाले. मात्र, डाॅ. हाेळी यांनी आपल्या पत्रकात त्याचा उल्लेख केला आहे, यावर डाॅ. उसेंडी यांनी आक्षेप घेतला आहे. २०१४ मध्ये गडचिराेली विधानसभा क्षेत्रातील अनेक विकासकामे पूर्ण झाली हाेती. सतांतरण हाेऊन राज्यात भाजपचे सरकार आले. त्या कामांचे केवळ लाेकार्पण भाजपच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे ती कामे त्यांनीच केली आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ. उसेंडी यांनी व्यक्त केली आहे.
केंद्राच्याच याेजनांचा केला गाजावाजा
केंद्र सरकारने देशभरात अनेक याेजना सुरू केल्या आहेत. या याेजनांचाही उल्लेख डाॅ. हाेळी यांची आपल्या पत्रकात केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
होळींच्या अडचणींत वाढ
आदिवासी तरुणाचे आंदोलन, व्हायरल ऑडिओ, विकास निधी नकोची विधानसभेत मागणी यामुळे डॉ. होळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गडचिराेलीचे विभागीय कार्यालय आपल्याच कालावधीत झाले आहे. त्यासाठी निधीसुद्धा आपल्याच प्रयत्नांनी मिळाला आहे. जी कामे आपण केली. त्याची यादी जनतेसमाेर ठेवत आहे. यात श्रेय लाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- आ. डाॅ. देवराव हाेळी
एसटीचे गडचिराेली येथील विभागीय कार्यालय आपल्याच कालावधीत मंजूर झाले. मात्र, त्याचे श्रेय जर आ. डाॅ. हाेळी लाटत असतील तर ते चुकीचे आहे. डाॅ. हाेळी यांना विकासकामांची यादी कमी पडत असेल, त्यामुळे ते त्यांनी न केलेल्याही कामांचा समावेश करीत आहेत.
- डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आमदार