क्रिष्णा गजबे यांचे प्रतिपादन : देसाईगंजात धम्मचक्र प्रवर्तन दिनदेसाईगंज/मोहटोला : अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी जगाला दाखविलेला धम्माचा मार्ग हा मानवी कल्याणाचा सर्वात उत्तम मार्ग होता. भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या आचरणाद्वारेच जगात शांतता अबाधित राहू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही मानवी जिवनाच्या उत्कर्षासाठीच होती, असे प्रतिपादन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज येथील सम्यक जागृत बौद्ध महिला समितीद्वारे दीक्षाभूमी येथील प्रांगणात ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. रजनी भगत, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, पंढरी गजभिये, विजय बन्सोड, उईके, एम. एन. बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी महामानवाचे विचार माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. संकुचितपणाच्या विळख्यातून बाहेर पडून प्रगतीच्या प्रवाहात सर्वांनी समाविष्ट होणे आवश्यक आहे. देशातील व राज्यातील शासनाने डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याकरिता केलेले प्रयत्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणारे आहेत. देसाईगंज येथील पवित्र दीक्षाभूमीचा विकास घडवून आणण्याच्या केलेल्या संकल्पाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपण कटिबद्ध आहो, राज्य शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू व देसाईगंज दीक्षाभूमीचा विकास करू, असे आश्वासन नागदेवे यांनी केले. प्रास्ताविक समितीच्या उपाध्यक्ष श्यामला राऊत, संचालन राजरतन मेश्राम तर उपस्थितांचे आभार जयश्री लांजेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समतीच्या अध्यक्षा कविता मेश्राम, सचिव ममता जांभुळकर, उषाकिरण बन्सोड, विद्या लोखंडे, डांगे, सुमित्रा रामटेके, रत्नमाला बडोले यांच्यासह सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
धम्मक्रांती मानवाच्या उत्कर्षासाठीच
By admin | Published: October 16, 2015 1:53 AM