सन २०२०-२१ हे वर्ष काेराेनामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला असताना, मजुरांच्या उपजीविकेसाठी परीक्षा निर्माण करणारे ठरले, देशात अन्य सर्व प्रकारचे रोजगार बंद असताना मग्रारोहयो मजुरांच्या मदतीला धावून आली.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यात धानोरा तालुक्यात तीन लाख ६५ हजार ५०० मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी बंडू निमसरकार यांचे मार्गदर्शनात तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक मजुरांना काम मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला उद्दिष्ट देण्यात आले. यासाठी पंचायत समितीचे सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांना विशिष्ट जबाबदारी देऊन कोणीही मजूर रोजगाराशिवाय राहू नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतचे सचिव व ग्रामरोजगार सेवक यांची सोशल डिस्टन्सचा वापर करून कधी ऑनलाईन तर कधी प्रत्यक्ष दहा-दहा ग्रामपंचायतीचे सभा बोलावून कामे सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यातूनच सद्यस्थितीत तालुक्यात ७७,३१,६२० इतके मनुष्य दिवस निर्मिती झाली. ही उद्दिष्टपूर्ती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टपूर्तीच्या २११.६९ टक्के असून जिल्ह्यात सर्वाधिक तर राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. यासाठी तालुक्याने १९९४.७९ लक्ष रुपये खर्च केले असून त्याची उद्दिष्टपूर्ती १२९.८० टक्के आहे. सदरची उद्दिष्टपूर्ती मागील १० वर्षातील सर्वोत्तम आहे यातूनच जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध झाला.
उद्दिष्टपूर्तीसाठी उपजिल्हाधिकारी रोहयो विजया जाधव यांचे ग्रामपातळीवर मजुरांच्या भेटी तसेच ग्रामरोजगार सेवक यांना ऑनलाइन मार्गदर्शन लाभले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो माणिक चव्हाण यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन मजुरांशी चर्चा केली. गटविकास अधिकारी बंडू निमसरकार यांनी ग्रामपंचायतनिहाय भेटी व ग्रामरोजगार सेवकांना मार्गदर्शन लाभले. त्यामुळे राेहयाेतून समृद्ध गाव विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली.