चुरमुरा : मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राकाँचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यशैलीवर ठपका ठेवून त्यांचा अवमान केला. या घटनेचा निषेध करीत धर्मरावबाबा आत्राम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस बाबा हाशमी, माजी आमदार हरिराम वरखडे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष जयदेव मानकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष लतीफ शेख, भास्कर बोडणे यांनी केली.पत्रकार परिषदेत माहिती देतांना बाबा हाशमी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फक्त मुंबईला बसून जिल्ह्याचा कारभार पाहत असतात. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून आजतागायत तालुक्यातील राकाँ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या नाही. पालकमंत्री आल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम बाहेर पडतात. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती कमकुवत होत आहे. याचाच परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. माजी आमदार हरिराम वरखडे, सुरेश पोरेड्डीवार यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत होते. तळागळातील लोकांपर्यंत पक्ष पोहचला होता. मात्र जिल्हाध्यक्षपदी धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती झाल्यापासून पक्ष संघटनेची फार मोठी हानी झालेली आहे. कोणत्याही तालुक्यात महिला व युवकांची समिती गठीत करण्यात आलेली नाही. यामुळे पक्षातील बहुतांश कार्यकर्ते विखुरल्या गेले आहेत, असेही बाबा हाशमी यावेळी म्हणाले.पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा विकासासाठी १९ कोटी व २२ कोटी रूपयाचा निधी दिला. मात्र या निधीतून मर्जीतील कंत्राटदारांना काम दिले. स्वत:च्या मुलीला जि. प. चे अध्यक्ष करण्यासाठी भाजपसोबत युती केली. मुंबईच्या बैठकीबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्यांना सूचना दिली नाही असा आरोप उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. (वार्ताहर)
धर्मरावबाबा आत्राम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा
By admin | Published: June 12, 2014 12:04 AM