लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : नजीकच्या सायगाव येथील बहुसंख्येने असलेल्या ढिवर (भोई) समाजाने आपल्या न्यायहक्कांसाठी २४ सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयाच्या राजीव भवनात समाजाला आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासात्मक दर्जा देण्यासंदर्भात मागण्यांसाठी नुकतीच बैठक घेऊन भोई समाज संघटनेची पायाभरणी केली.
प्रा. भाग्यवान मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मेश्राम यांनी, ढिवर भोई समाजाला पुढे जायचे असेल तर विखुरलेल्या समाजाला एकत्र आल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. तसेच वंचित असलेला हा समाज गरीब व अशिक्षित असून, मच्छीमार हा मुख्य व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. परंतु, समाजाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही, एनटीबीच्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही, त्यासाठी समाजाने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि एकत्र या तरच समाजाचा विकास होणार, असेही आवाहन त्यांनी केले.
बैठकीला सरपंच शिल्पा कोल्हे, उपसरपंच मनोज पांचलवार, सदस्य देवांगणा दुमाने, सदस्य चंदा मेश्राम, व ढिवर समाजबांधव, भगिनी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील दुमाने यांनी केले. आभार राजकुमार मेश्राम यांनी मानले. याप्रसंगी गावातील समाजाची महिला व पुरुषांची समिती गठित करण्यात आली असून, सुखदेव कोल्हे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आरक्षणाचा प्रश्न कायमच गावातील बहुसंख्य असलेला ढिवर समाज वास्तव्यास असून, या समाजाकडे कुठल्याही प्रकारची शेती किंवा आर्थिक साधनसामग्री नाही. हा समाज अतिशय वंचित घटक असून, सरकारचे विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील समाजाकडे दुर्लक्ष होत आहे.