गडचिरोली : अर्धा जुलै सरला तरीही जिल्ह्यात सरासरीपेक्षा निम्माही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. १७ जुलै रोजी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर धो- धो पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली - भामरागड राष्ट्रीय महामार्गासह डझनभर रस्ते पाण्याखाली गेले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आलापल्ली- भामरागड महामार्ग क्र.१३० डी वर भामरागड येथे पर्लकोटा नदी तुडूंब भरुन वाहत आहे. नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भामरागडमधील अंतर्गत रस्ते देखील पाण्याखाली गेले असून आवश्यकतेनुसार वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. हे रस्ते गेले पाण्याखाली
चातगाव -कारवाफा- पोटेगाव- पावीमुरांडा- घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगांव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला), कुनघाडा- गिलगांव पोटेगाव रस्ता (पोटेगावजवळ), तळोधी- आमगाव -एटापल्ली -परसलगोंदी- गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी), तळोधी -आमगाव -एटापल्ली- परसलगोंदी -गट्टा रस्ता (बांडीया नदी), अहेरी -आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला), अहेरी- आलापल्ली- मुलचेरा- घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला), अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला), आलापल्ली- ताडगाव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग ( पर्लकोटा नदी), आलापल्ली -ताडगांव -भामरागड - लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व (बिनागुंडा नाला), कसनसूर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला), कसनसूर -एटापल्ली- आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला) आष्टी – गोंडपिंप्री- चंद्रपूर हे रस्ते पाण्याखाली गेल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
एसटी बसचा खोळंबा, वीजपुरवठाही बंद
भामरागडमध्ये १८ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नागपूर, ७ वाजता गडचिरोली तर पावणेनऊ वाजता कोठी बस मार्गस्थ झाली, पण या बस पुराच्या पाण्यामुळे रोखून धरल्या आहेत. वादळ-वाऱ्यात झाडाच्या फांद्या तुटल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे. बांडीया नदीच्या पुलावर पाणी राहिला तर संपूर्ण तालुका संपर्क तुटू शकतो.