गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘चिमणी चिव नाही अन् कावळा काव नाही, अशा भव्य अरण्यात’ अशी विशेषणे असलेल्या कथा व गोष्टी बालपणी ऐकत असताना पटकन लक्षात यायचे की, ‘हे’ पक्षी गावालगतच असतात. जंगलात राहत नाहीत. ८ ते १० वर्षांपूर्वी हे जाणवायचेसुद्धा; परंतु आता ही स्थिती बदलली. गावोगावी, घरे व झाडांवर दिसणारे कावळे आता कुठे अदृश्य झाले? खरंच कावळे कुठे गडप झाले, हे मात्र कुणालाच कळेना झाले आहे. जागतिक कावळा दिनानिमित्त याकडे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.
कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. विशेष म्हणजे, त्याच्या ओरडण्याचा व पाहुणे घरी येण्याचा काही एक संबंध नाही; पण त्यानिमित्ताने कावळा आठवत होता, घरावर दिसत होता. मात्र, आता तो दिसेनासा झाला आहे. पिंडाला शिवण्यासाठीही कावळ्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने घटली, जैवविविधतेच्या ऱ्हासाची ही नांदीच नाही काय? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे.
कावळे काय खातात?
कावळ्याला सर्वभक्ष्यी पक्षी म्हटले जाते. त्याचे सरासरी आयुष्य १२ ते १५ वर्षे असते. त्याचे मुख्य अन्न हे शिजलेले अन्न, धान्य, अंडी, फळे, बिया, शिळे अन्न हे आहे. प्रसंगी उंदीर, चुचुंद्री, बेडूक आदींची शिकारही ते करतात. याशिवाय शेतातील किडे, अळ्या, जनावरांच्या अंगावरील गोचीड, जखमेतील किडेसुद्धा कावळे खातात.
मानवी वस्तीने संपविला कावळ्यांचा अधिवाससिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे झाडांचे प्रमाण कमी झाले. गावालगतची अन् वस्तीतली झाडे नष्ट झाली. कावळे हे वस्तीलगत वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला. आपोआपच कावळ्यांनी गाव सोडले, काही नष्ट झाले. - महाराष्ट्रात मे ते जुलैदरम्यान त्यांचा विणीचा हंगाम असतो. कावळे ४-५ अंडी घालतात, असे पक्षीप्रेमी अजय कुकडकर यांनी सांगितले; पण आता तसे अधिवासाचे वातावरण त्यांना मिळेनासे झाले आहे.