लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पेट्राेल व डिझेलचे भाव सातत्याने वाढतात म्हणून इतर सर्व वस्तूंचे भाव वाढविण्यात आले हाेते. केंद्र शासनाने चार दिवसांपूर्वी एकाचवेळेवर डिझेल १० रुपये व पेट्राेल ५ रुपयांनी स्वस्त केले. पेट्राेल व डिझेल स्वस्त झाल्यावर इतर सर्व वस्तू स्वस्त हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. डिझेलचे भाव वाढल्यास निर्मितीचा खर्च वाढतो तसेच वाहतुकीच्या खर्चात भर पडत असल्याने डिझेलच्या वाढीबराेबरच वस्तूंच्या किमतीही वाढविल्या जातात. एवढेच नाही तर प्रवासी भाडेसुद्धा वाढविले जाते. दरवाढीमागे कारण विचारल्यास पेट्राेल व डिझेलचे भाव वाढल्याने दरवाढ झाली आहे, असे सांगितले जाते. चार दिवसांपूर्वी शासनाने पेट्राेल व डिझेलचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे आता वस्तूंची निर्मिती व वाहतुकीवरीलही खर्च कमी झाला आहे. मात्र, सर्वच वस्तूंचे भाव जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेट्राेल व डिझेलचे दर उतरल्याचा ग्राहकांना काय फायदा झाला, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. काेणत्या ना काेणत्या कारणामुळे दरवाढ हा बाजारपेठेचा नियम आहे.
वाहतुकीचे दरही जैसे थे- डिझेलचा सर्वाधिक वापर वाहतुकीच्या वाहनांमध्ये केला जाते. डिझेलचे दर कमी झाल्यानंतर वाहतुकीचे दर कमी हाेणे आवश्यक हाेते. मात्र प्रत्यक्षात वाहतुकीचे दर अजिबात कमी झाले नाही. त्यामुळे डिझेल स्वस्त झाल्याचा जनतेला काहीच फायदा झाला नाही.
महाग करण्याची घाई स्वस्त कधी हाेणार?- उत्पादन खर्चाशी संबंधित एखाद्या कच्च्या मालाची भाव वाढ झाली की, व्यापाऱ्यांना तेवढेच कारण पुरेसे राहते. लगेच काही दिवसांत उत्पादनाची भाव वाढ करतात. मात्र, कच्च्या मालाचे भाव कमी झाले तरी उत्पादनाची किंमत कमी केली जात नाही. उलट ती स्थिर ठेवली जाते. हाच नियम पेट्राेल व डिझेलचे दर कमी हाेण्याला लागू झाला आहे. व्यापारी, व्यावसायिक यांचा हा अलिखीत नियम आहे. या नियमाच्या आधारेच चढाव व उताराचा फायदा व्यापारी व व्यावसायिक घेत असतात.
डिझेलचे दर पुन्हा जैसे थे हाेण्याची भीतीकेंद्र शासनाने सध्या पेट्राेल व डिझेलचे दर कमी केले असले तरी ते पुन्हा वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार दर दिवशी पेट्राेल व डिझेलचे दर वाढत राहतात. त्यामुळे पुढील एक महिन्यात ते दर आणखी जुन्याप्रमाणेच हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यापारीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.