खवय्यांसाठी अच्छे दिन : गावातून शहरात विक्रीसाठी घेऊन येतात नागरिकगडचिरोली : तृषार्त धरेला शांतवत पावसाळा आला की, धरणीला नवा तजेला मिळतो. तशाच रानात नवनव्या भाज्यांचीही उगवण होते. आता अशा अनेक भाज्या बाजारात दाखल होत असून या भाज्यांची ओळख असणारे आवडीने खरेदी करीत आहेत. भाजीविक्रेत्यांनाही या माध्यमातून रोजगार मिळाला आहे.पावसाळ्यात रानातून जाताना मोगऱ्याच्या सुंगधासारखाच एक आगळा सुगंध दरवळत असतो. या सुगंधाचा मागोवा घेतल्यास रानात प्राजक्ताच्या आकाराची छोटी पांढरी फुले दिसतात. या फुलांचा सुगंध धुंद करणाराच असतो. ही सुगंधी फुले कुड्याची फुले म्हणून ग्रामीण भागात ओळखतात. अतिशय सुगंधी असणारी ही फुले तेवढीच स्वादिष्टही असतात. मात्र, त्याची भाजी विशिष्ट पद्धतीने करावी लागते. ही फुले उकडून भरपूर कांदे घालून बऱ्यापैकी तेलात केलेली भाजी अगदी अंडाभूर्जीसारखीच लागते. अनेकजण या शाकाहारी भाजीला अंडाभूर्जी समजून फसतात. त्यानंतर पाऊस वाढला की, अळींबीच्या जुड्या बाजारात दिसतात. मोठ मोठ्या आलीशान हॉटेलमध्ये सर्व्ह होणारे मशरूम म्हणजे या अळींबीच आहेत. जंगलात नैसर्गिकरित्या उगवलेल्या अळींबी गोळा करण्यासाठी अनेकजण रानाची वाट धरतात. नजिकच्या शहरात अळींबी विकायला आली, की ग्राहकांची झुंबड उडते. इकडच्या ग्रामीण भागात या भाजीला सात्या किंवा डुंबर सात्या म्हणतात. याशिवाय शेरेडेरे, कडूभाजी, धान भाजी, लेंगडा भाजी (पांढऱ्या मुसळीच्या पानांची भाजी), फेट्रा अशा अनेक भाज्या पावसाळ्यात खाण्यात येतात. महानगरात दुर्मिळ असणाऱ्या या भाज्यांची चव घ्यायची असेल, तर गडचिरोलीसारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्याशिवाय पर्याय नाही.
बाजारात दाखल झाल्या वेगवेगळ्या रानभाज्या
By admin | Published: July 09, 2016 1:32 AM